मी पटकन मागे पाहिलं...
ती खरचं सुंदर होती. अगदी नजरेत भरेल इतकी सुंदर.. निळ्याशार साडीत तर जास्तच उठून दिसत होती.. मुंबईच्या भाषेत अगदी जबरदस्त माल आणि थेट कोल्हापूरच्या रांगडी भाषेत सांगायचं झालं तर अगदी काटा कीर...
दिपकच्या त्या खुणेनं आमच्या टोळक्यातले सर्वचजण तिच्याकडे बघायला लागले.. आतापर्यंत तिलाही ते समजलं होतं. बरोबर असलेल्या मुलाकडे पाहून ती अगदी लाजून हासली... हाय !!.. ते हसणं ही घायाळ करणारं... ती आपल्या या मित्राबरोबर रामोजीच्या त्या घाणेरड्या कॅन्टीनमध्ये अगदी शेवटच्या टेबलावर बसेपर्यंत आमच्यातला प्रत्येक जण तिच्याकडे पाहत होता...
रामोजीत एखादी नवीन मुलगी आली की आमचा हा उद्योग नेहमीचाच...
“ नवं फिड दिसतंय ”... संजय भोसले ची जिज्ञासा जागी झाली.
“ अरे बांग्लामध्ये इंटर्व्यू सुरु आहे ना !” – दिपकनं पक्की माहिती पुरवली..
इतर डेस्कमधल्या मुली आणि त्यांची सर्व अपडेट मिळवण्याचा दिपक हा आमचा सोर्स होता.. आणि पठ्ठ्यानं याही वेळा अचूक माहिती पुरवली होती..
“ लय भारी आहे. सिलेक्ट व्हायलाच हवी... लय त्रास व्हणार बाबा आता ” – पुन्हा संजय.. आणि आपल्या विशिष्ट पध्दतीनं हसला..
आतापर्यंत मेघराजच्या हातातली सिगरेट संपली होती आणि थोटकं फेकत मेघराज नुसताच हसला..त्यानं पुन्हा एकदा कॅन्टीनमध्ये तिच्या टेबलकडे पाहिलं..
एव्हढ्यात प्रदीप पाटील आतून बाहेर आला...
“ काय दादा..”
आम्ही विषय बदलला ( आम्हाला भीती होती की हा शीघ्र कवी या नवीन मुलीवरच एखादी कविता बोलायला लागायचा ) चहाचा शेवटचा सीप घेत तिथून निघालो.. बुलेटिनची वेळ झाली होती... रनऑर्डर अपडेट करायची होती... दोन तास उरले होते... घरी जायला.. सकाळच्या शीप्ट हे एक चांगल होतं... पाचच्या आत घरात. आणि मला आत्तापासूनच घराचे वेध लागले होते.....
सुमारे महिन्याभरातच ती पुन्हा एकदा दिसली.... एकटीच होती... कॅन्टीन बाहेर.. यावेळी माझ्याबरोबर ही कुणी नव्हतं.. मी ही तिच्याकडे पाहत पाहतच कॅन्टीनच्या दिशेनं निघालो होतो.. तेव्हढ्यात तिचा तो मित्र कॅन्टीनच्या बाहेर आला... त्याच्या हातात कसलीशी पिशवी होती.. डबा होता बहुतेक.. दोघं निघाली... मी आपला कॅन्टीनमध्ये घुसलो... वेजपफ आणि चहा प्यायला.. हे रामोजीतलं आमचं खाद्य..... नाष्टाही आणि कधी-कधी जेवण ही..
“ चला, ती परत आल्याची बातमी सर्वांना द्याला हवी..” मी मनात म्हटलं..
मी डेस्कवर पोचतोय तेव्हढ्यात दिपकनं हाक मारली..
“ अरे बंडू ती सिलेक्ट झाली.. पाहिलीस का. पण प्रोब्लेम आहे तिचं लग्न झालंय, तिच्याबरोबर असतो ना तोच तिचा नवरा आहे. दोघही एंकर आहेत.”
दिपकनं सर्वच माहिती काढून ठेवली होती.... म्हणजे आता त्यादिवशी कॅन्टीनबाहेर उभ्या असलेल्या सर्वांनचे हृद्याचे तुकडे झाले असतील...
सोडा आपल्याला काय त्याचं...
माधुरी बुलेटिन संपवून परतली.. आम्हाला पाहून थांबली....
मी माधुरीला त्या दोघांबद्दल विचारलं.
“ वृष्टी आणि अंकूर ” ...
नुकतंच लग्न झालंय, लवमैरेज... कोलकाताच्या अल्फा चैनलमधून आलेत... अशी सर्व इत्तमभूत माहिती आम्हाला मिळाली.... माधुरी माझ्या जिज्ञासू चेह-याकडे बघून हसत-हसत होती...
एखादी मुलगी आली की आमच्या तिच्याबद्दलच्या प्रश्नांची माधुरीला सवय झाली होती.. त्यामुळं ती अशी सर्व माहिती आमच्यासाठी काढायची....
परफेक्ट कपल... एकमेकांना साजंसे... एकदम मेड फॉर इच अदर.. मला अंकूरचा हेवा वाटायला लागला होता... मी आत्तापर्यंत फक्त तिलाच पाहतो होतो. पण आता दोघांना एकत्र पाहताना मला अंकूरचा हेवा वाटायला लागला होता...
दिलसुखच्या बसमधून दोघं एकत्र उतरत. आमची सुषमाची बस ही त्याचवेळा पोचायची.. त्यामुळं त्यांच्याकडे माझं नेहमीच लक्ष जायचं.. बसमध्ये उतरताना तो तिला हाथ द्यायचा... तिच्या हाथातल्या पिशव्या घ्यायचा. (बहुतेक डबे असावेत). मग ती त्याच्याकडे पाहून सुंदर हसायची... त्याचे डोळे ही चमकायचे... आणि दोघं ऑफिसकडे निघायचे... हे मी रोजच पाहत होतो.. बरं वाटायचं..
अनेकदा मी दिलसुखनगरच्या बसमध्ये चढायचो.. माझं लक्ष या दोघांकडेच असायचं... दोघंही नेहमी गप्पा मारत असायचे... मध्येच ती डोकं त्याच्या खांद्यावर ठेऊन झोपायची.. तो ही रामोजी येईपर्यत तिची झोप उडणार नाही.. याची काळजी घ्यायचा.... तिला अगदी जपायचा...
एकदा टैकबैन्डला एकटाच भटकत असताना पावसाची सर आली... अगदी जोरात... हैद्राबादमध्ये असं नेहमी घडायचं. अगदी रोमांटिक एटमॉसफियर तयार झालं.. तेव्हढ्यात हे कपल समोरुन येताना दिसलं. चिंब भिजलेलं.... वृष्टी बरसत होती. अंकूर फुलत होता....
काही महिन्यात मी पुन्हा मुंबईला परतलो... ही बदली कायम स्वरुपी होती... म्हणजे आता हैंद्राबाद नाही.... आणि रामोजीही नाही..
मुंबईला परतल्यानंतर एखाद दुस-यावेळा मी माधुरीला वृष्टी आणि अंकूर बद्दलही विचारलं होतं…
पण नउ ते दहा महिन्यानंतर माझी रवानगी पुन्हा हैद्राबादला झाली... काही महिन्यांसाठी... रामोजीला अनेकांनी रामराम ठोकला होता.. मी तिथली सिस्टम माहित होती.. त्यामुळं माझा नंबर लागला.. हैद्राबादच्या भाषेत सांगायचं तर पोंगा लागला... मी हिरमुसलो होतो... पुणे मुंबईसारखं मी हैद्राबाद-मुंबई केलं होतं... यावेळी मी गजाननचा रुम पार्टनर झालो... कारण बंगला आणि राजवाडा दोन्ही आता ओस पडले होते..
दिलसुखच्या गाडीत चढताना मी पाहिलं अंकुर एकटाच होता..त्याच्या शेजारीला वृष्टी नव्हती. यापुर्वी दोघांना एकत्र पाहण्याची सवय होती. त्यामुळं काहिसं वेगळं वाटलं.. विचार केला तिची शिप्ट वेगळी असेल..
रामोजीत पोचलो... काही वेळानें पाचच्या सुमारास चहा प्यायला निघालो... तिथं ती दोघं होती.. तशीच छान गप्पा मारत.. छान वाटलं..
काही दिवसांनी आम्ही सर्वजण असेच कैन्टीनमध्ये बसलो होतो. वृ,ष्टी आली. तिच्याबरोबर बांग्ला डेस्क मधला एक प्रोड्युसर होता.. त्याचं चहा पिण सुरु होतं. तेव्हढ्यात अंकुर ही तिथ पोहचला. आणि वेगळ्या टेबलावर चहा घेउन बसला.. मला हे थोडसं खटकलं... कदाचित दोघांचं भांडण झालं असेल..
पण दुस-या दिवशी येताना पाहिलं. पुन्हा वृष्टी आणि तो प्रोड्युसर एकत्र दिलसुख नगरच्या गाडीत होतं.. अगदी आजूबाजूला बसलेले. आणि अंकुर मागे बसलेला आपल्या मित्रांबरोबर...गाडीतून उतरताना ही अंकुर अगोदर उतरुन पुढे चालू लागला. आता तो प्रोड्युसर अंकुरच्या भुमिकेत होता.. त्यानं तिच्या हातातलं सामान घेतलं. तिला खाली उतरण्यासाठी हात दिला.. अंकुर कधीच पुढे गेला होता..
“अरे माधुरी.. त्या अंकुर आणि वृष्टीचं काय बिनसलंय का? ”.. मी माधुरीला विचारलं
“ तुला कशाला रे नसत्या चौकश्या ”.. – माधुरी
“नाही गेल्या काही दिवसांपासून ते मला वेगवेगळे दिसतायत.” मी म्हटलं
“ अरे त्यांचा डिवोर्स झालाय. तो मुलगा जो तु पाहिलास ना तो बाग्ला डेस्कचाच प्रोड्युसर आहे. आता वृष्टी त्याच्याबरोबर राहते. ”
माझ्यासाठी हा भुकंप होता....
“ आणि तरी ही दोघं एकत्र काम करतात... एकाच डेस्कवर.. ” मी तिला अनेक प्रश्न विचारले...काय झालं, कसं झालं... माधुरी जास्त सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. कदाचित तिला हे माझ्यासारखाच त्रास झाला असावा.... तिची ती अवस्था पाहून मी ही जास्त काही विचारलं नाही...
आता येता जाता माझं लक्ष नेहमी बांग्ला डेस्क वर जायचं.. ती दोघं अगदी नॉर्मल बोलत असायची.... ब्रेकिंग न्यूज आणि प्राईम टाईमला बांग्ला डेस्कला कल्ला असायचा. ही दोघं ही त्या कल्ल्यात शामील व्हायची.. काम संपलं की अनेकदा वृष्टी आणि अंकूर दोघंच चहा प्यायला जायची.. अनेकदा मग तो प्रोड्यूसर ही त्यांना जॉईन व्हायचा... ते नॉर्मल होते पण मी खुपच डिस्टर्ब झालो होतो. आज ही आहे...
बांग्ला डेस्कवर माझा एक मित्र होता. टॉय. त्याच्याकडून काही माहिती मिळाली....
रामोजीत आल्यावर काही महिन्यानंतर वृष्टी आणि अंकुर दोघांच्या शिप्ट वेगवेगळ्या लागायला लागल्या... एकाची मॉर्गिंन दुस-याची नाईट,.. एक यायचा तर दुसरा जायचा.. विकली ऑफ ही वेगवेगळे..... दोघं ही त्रस्त होते.. यानं व्हायचं तेच झालं.. भाडणं... एकमेंकांना किती वेळ देतो याचं गणित मांडायला लागायचे..
त्याच दरम्यान तो प्रोड्युसर आणि वृष्टीतली जवळीक वाढली.. इतकी वाढली की तीनं त्याच्यात अंकुरचा पर्याय शोधला.. दोघांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला..
त्यानंतर रामोजीत या दोघांबद्दल अफवांचं पेवंच फुटलं होतं.. कुणी वृष्टीच्या चारीत्र्याकडे बोट दाखवत होतं तर कुणाला अंकुर चुकीचा असल्याचा वाटत होतं.
पण डिवोर्सचा मानसिक ताण इतका होता की काही दिवसांसाठी वृष्टी कोलकत्याला गेली होती.. तिथं तिला मानसिक उपचार ही घ्यावे लागले.. जे नातं तुटलं होतं. त्याचा तिला जास्त त्रास झाला होता. पण हे नातं ज्या पध्दतीनं तुटलं होतं. त्याचा त्यापेक्षाही जास्त त्रास होत होता..
दोघांनी म्युच्युअल अंडरस्टैंडींगनं डिवोर्स घेतला.. पुन्हा हैद्राबादला परतले...एकमात्र चांगलं झालं... त्याचं पती-पत्नीचं नातं तुटलं असलं तरी मैत्रीचं नातं कायम होतं... वृष्टीच्या नव्या साथीदाराला ही ती मैत्री खटकत नव्हती..
काही दिवसांनी वृष्टीचा नव्या साथीदारानं चैनल्स बदलंलं.. हैंद्राबाद सोडून कोलकत्त्याला गेला.. त्यानंतर अनेकदा वृष्टी आणि अंकुर एकत्र दिसले... रामोजीत आणि रामोजीच्या बाहेर ही...
काही दिवसांनी वृष्टीही कोलकत्याला गेली.. अंकुर अजूनही रामोजीत आहे.
माझ्या हैद्राबादच्या वास्तव्यातली ही सर्वाच वाईट आणि मनाला बोचणारी घटना आहे..
मुंबईत आल्यानंतर मी हे सर्व विसण्याचा प्रयत्न करत होतो.. विसरलो ही होतो.. आज पाच वर्षांनतर आमचा एक कैमरामन मित्र सुब्रतो चौधरी, मुळचा कोलकत्याचा.. त्यानं मी ई टिव्हीला काम केल्याचं समजल्यानंतर अंकूर बद्दल विचारलं... सुब्रतो, वृष्टी आणि अंकुर दोघांचा चांगला मित्र, दोघांच्या लग्नात ही गेला होता.. त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से त्यानं सांगितले.. आम्ही कितीतरी वेळ त्या दोघांबद्दल बोलत होतो.. मी त्याला डिवोर्सचं नेमकं कारण विचारलं.
“ऐसा है नरेनजी... आईना तुटता है ना तो वह जुड पाना बहोत मुश्कील होता है.. जुडा तो भी गंदा दिखता है.. तकलीफ होता है.. ऐसा होने से अच्छा हुआ आज दोनो खुश है...वही अच्छा है..”
आमच्या संभाषणातले सुब्रतोचे हे शेवटचं वाक्य होतं..
मला हे पटलं नव्हतं.. तरी ही मी मान हलवली.
अनुभव पुस्तकात बासू भट्टाचार्यांनी एक किस्सा सांगितलाय. अमेरीकेतल्या एका फिल्म फेस्टीवलमध्ये बासूंच्या चित्रपटांचा रेट्रो होता... तो संपल्यानंतर एक अमेरीकन विद्यार्थ्यानं त्यांना विचारलं.. तुमच्या सिनेमात नायक-नायिका भांडतात पण सिनेमाच्या शेवटी दोघं एकत्र येतात. दोघांमध्ये किती ही डिफरेन्स असले तरी.. इतकं नातं जड होतं तर ते एकमेंकांपासून दूर का नाही होत..
बासूंनी त्याला उत्तर दिलं.. हा तुझ्या आणि माझ्या संस्कृतीतला फरक.. तुम्ही कप तुटला की तो फेकून देता त्याऐवजी नवा कप रिप्लेस करता.. माझी संकृती वेगळी आहे, आम्ही तो तुटलेला कप रिपेयर करतो...
वृष्टी आणि अंकूरचं पती पत्नीचं नातं रिपेयर झालं नाही.. याचं मला खूप दुखं वाटतं..
गेल्या काही वर्षात मी असे अनेक वृष्टी आणि अंकुर पाहिलेत...